पनवेल दि.10: केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बॅंकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता कर्नाळा नागरी बॅंकेच्या ठेवीदारांना एक लाखांऐवजी थेट पाच लाख रूपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जाहिर झाल्यानंतर ‘आमच्याच प्रयत्नाने हे झाले’, अशी आवई उठवायला काही स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.
कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाचा फोडली. आमदार बालदी आणि आमदार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी, मोर्चे, आंदोलन, पाठपुरावा या सर्व लढाई लढल्यानंतर हे यश ठेवीदारांच्या पदरात पडले आहे.
केंद्र सरकारने विमा संरक्षण दिल्याने केंद्र सरकार व ठेवीदारांची पुण्याई म्हणावी लागेल. पूर्वी एक लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण होते, मात्र दूरदृष्टी असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संरक्षण रक्कम पाच लाखांनी वाढवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे हा निर्णय भाजप सरकारने ठेवीदारांच्या हितासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.
ठेवीदारांना पैसे मिळोत न मिळो फक्त आणि फक्त विवेक पाटील घोटाळ्यातून बाहेर पडावेत यासाठी शेकापने प्रयत्न केले आहेत, मात्र असे असतानाही आता त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकाप नेत्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. वास्तविक केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ठेवीदारांना विम्याच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत, याचा सोयीने विसर शेकापच्या नेत्यांना पडला आहे.
‘होय मीच पैसे घेतले’, असे छातीठोक पणे सांगणारे विवेक पाटील यांच्याकडे गडगंज मालमत्ता असताना ती विकून गोर गरिब ठेवीदारांचे पैसे शेकापने का मिळवून दिले नाहीत, हा प्रश्न उपस्थित होतो. शेकापचे आयत्या बिळावरचे नागोबा असलेले पुढारी तेव्हा गप्प का राहिले. जर लोकांचे पैसे तेव्हाच दिले असते तर विवेक पाटलांना जेलची हवा खावी लागली नसती. मात्र, विवेक पाटलांची मग्रुमी कमी करण्यासाठी तर शेकाप नेत्यांची हा डाव रचला नव्हता ना, असा संशयही निर्माण होत आहे.
पैसे बुडल्याचे समजल्यावर, ठेवीदारांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहिले, अनेकांची लग्न झाली नाहीत, अनेकांचे वैद्यकीय उपचार झाले नाहीत आणि त्यातून अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत, मात्र त्यावेळी विवेक पाटलांच्या आणि शेकाप नेत्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला नसेल जेलमध्ये गेल्यावर नक्कीच अश्रू अनावर झाले नसतील. विवेक पाटील कधी बाहेर येतात याची शेकापच्या ढोंगी पुढाऱ्यांना उत्सुकता लागली असेल. पण लोकांची करोडोंची मालमत्ता हडप करून विवेक पाटील उजळ माथ्याने फिरू शकतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.