पनवेल दि.०१: ज्येष्ठ, लोकप्रिय पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी सांगता वर्षानिमित्त देशभरातील रफीप्रेमींनी विविध कार्यक्रमांद्वारे रफीसाहेबांना आदरांजली अर्पण केली. या शताब्दीनिमित्त पनवेल-नव्या मुंबईत सांस्कृतिक क्षेत्रात गेली 35 वर्षे उत्तम नावलौकिक मिळविलेल्या पनवेल कल्चरल सेंटरने द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड यांच्या सहयोगानेे पनवेलमध्ये भव्य, संस्मरणीय अशा राज्यस्तरीय रफी गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. 16 ते 40 आणि 41 व त्यापुढील अशा दोन गटात झालेल्या या स्पर्धेत तब्बल 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून अंतिम फेरीसाठी 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेपूर्वी या वीस जणांना गायिका, लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक आणि या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. मृदुला दाढे आणि संगीतकार, नोटेशन तज्ज्ञ व चित्रपट संगीत अभ्यासक अरविंद मुखेडकर यांचे गाणं कसं सादर करावं, दमश्वास, गाण्यातले भावदर्शन अशा अनेक विषयांत मौलिक मार्गदर्शन लाभले.
‘याद न जाये..’ या नावाने पनवेलमधील फडके नाट्यगृहात दि. 22 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेली या स्पर्धेची अंतिम फेरी हा रसिकांसाठी रफीसाहेबांच्या 23 सोलो गाण्यांचा रंगतदार कार्यक्रमच ठरला. स्पर्धेचा नियम म्हणून पांढरा शर्ट परिधान केलेल्या सर्व स्पर्धकांनी एका ताला-सुरात वाद्यवृंदाच्या साथीने सुरुवातीला सादर केलेले राष्ट्रगीत हा रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरला.
या स्पर्धेत 16 ते 40 या वयोगटात करण म्हात्रे (दिल जो न कह सका..) यांनी प्रथम क्रमांकाचे (रु. 7,000 रोख व स्मृतिचिन्ह) पारितोषिक संपादन केले तर पंढरीनाथ हुलावले (वादियाँ मेरा दामन..) यांनी द्वितीय क्रमांकाचे (रु. 5,000 रोख व स्मृतिचिन्ह) पारितोषिक मिळविले. 40 पुढील वयोगटात अंबरीश म्हात्रे (तुमने मुझे देखा..) यांनी प्रथम क्रमांकाचे (रु. 7,000 रोख व स्मृतिचिन्ह) पारितोषिक पटकावले तर उदय कुडतरकर (दिल की आवाज भी सुन..) यांनी द्वितीय क्रमांकाचे (रु. 5,000 रोख व स्मृतिचिन्ह) पारितोषिक संपादन केले. याशिवाय हरचरणजीत सिंग आणि विजय पंडित या साठीपार स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. पनवेलमधील निष्णात सर्जन माजी रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. गिरीश गुणे, डॉ. मृदुला दाढे, अरविंद मुखेडकर आणि पनवेल कल्चरल सेंटरचे अध्यक्ष मिलिंद गोखले यांच्या हस्ते ही पारितोषिके देण्यात आली.
गेली तीन ते चार दशके विविध वाद्यवृंदांतून रफीसाहेबांची गाणी सादर करणार्या प्रभंजन मराठे, नितीन डिस्कळकर आणि दीपक चव्हाण व्यावसायिक गायकांचा याप्रसंगी शाल-स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या तिघांनी रफीसाहेबांचे एकेक गाणेही सादर केले. या स्पर्धकांना व गायकांना उत्कृष्ट साथसंगत केली, महेंद्र गोखले (सिंथेसायझर), सुभाष मालेगांवकर (अॅकॉर्डियन), डॉ. अजित गोरे (इले. गिटार), अजय दामले (तबला व ऑक्टापॅड), अनिल खैरनार (ढोलक व हँडसॉनिक) आणि विनायक कुलकर्णी (पर्कशन्स) यांनी. सुप्रसिद्ध निवेदक संदीप कोकीळ यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या उपक्रमास नील ग्रूप, पनवेल आणि पनवेल महानगरपालिका यांचे व्हेन्यू पार्टनर म्हणून सहकार्य लाभले होते. जयंत टिळक आणि सतीश गुणे यांनी या उपक्रमाचे काटेकोर नियोजन केले तर मिलिंद गोखले, श्रीधर सप्रे, चंद्रकांत मने, अजय भाटवडेकर, डॉ. मनोज रणदिवे, मिलिंद देशमुख, राकेश पांडे, ज्योती गुणे, अश्विनी फडके यांचे त्यांना उत्तम सहकार्य लाभले.