पनवेल दि.८ : गव्हाणच्या ग्रामीण भागामध्ये थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांनी शिक्षणाचे संकुल उभे केल्याने आमच्यासारख्या अनेकांना शिक्षण घेता आले. भगतसाहेबांच्या या शैक्षणिक धोरणामुळेच आज अनेकांची प्रगती झाली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि.7) केले. ते स्व. जनार्दन भगत यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीतील भागूबाई चांगू काना ठाकूर कॉलेज ऑफ लॉ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. जनार्दन भगत यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी लॉ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेले उपहारगृह, लीगल अॅड सेंटर, एनएसएस अॅण्ड डीएलएलइ ऑफिसचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, सदस्य संजय भगत, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, वर्षा प्रशांत ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. विनायक कोळी, गणेश कोळी, लॉ कॉलेजच्या प्राचार्य सानवी देशमुख आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे जाळे फोफावत आहे. संस्थेच्या अनेक शाळा-महाविद्यालयांतून आज अनेक विद्यार्थी घडविले जात आहेत. खारघर येथील विद्यालयाला शासनाचे मिळालेले पारितोषिक हीसुद्धा संस्थेच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. जनार्दन भगत यांनी जनता, समाजासाठी कार्य केले. शिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य केले. त्यांनी रचलेल्या कार्याचा पाया अधिक मजबूत करूया.
संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनेक शैक्षणिक संकुले निर्माण केलीत. हे कार्य करीत असताना रामशेठ ठाकूर यांचे प्रेरणास्थान जनार्दन भगत हेच आहेत. भगतसाहेबांनी खेडोपाड्यात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या. त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो.
पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी म्हटले की, जनार्दन भगत यांनी समाजासाठी काम केले आहे. त्यांचे हे कार्य हे समाजापर्यंत निरंतर पोहचावे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल-उरण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली आहे. रायगडकरांना रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने एक शिक्षणमहर्षीच मिळाला आहे. उपस्थितांचे आभार लॉ कॉलेजच्या प्राचार्य सानवी देशमुख यांनी मानले.