पनवेल दि.९: पनवेल येथील प्राचीन श्री विरूपाक्ष महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्याला बुधवार दिनांक ८ मे रोजी २१ वर्षे पूर्ण झाली. जीर्णोद्धाराच्या २१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल मधील पत्रकार बांधव आणि विविध मंदिरांच्या न्यासाचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लक्ष पुष्प अर्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता. देवस्थान विश्वस्त व सेवा समूह यांच्या वतीने परमोच्च प्रसन्नतेची अनुभूती देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यती असा पार पडला.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर गाभाऱ्यामध्ये १२ विविध प्रकारची पुष्पे अर्पण करून लक्ष पुष्प अर्चन सोहळा पार पडला. प्रसाद कर्वे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री शंभू महादेवाचे नाम उच्चारण झाल्यावर अर्चन सोहळ्यासाठी बसलेले मान्यवर “पुष्पाणी समर्पयामी” असे म्हणत फुले अर्पण करत होते. विशेष म्हणजे श्री विरुपाक्ष महादेव मंदिराच्या इतिहासात हा सोहळा पहिल्यांदाच पार पडला.
श्री विरुपाक्ष महादेव मंदिर विश्वस्त आणि सेवा समूह यांनी अथक परिश्रम घेऊन पारंपारिक परंतु शानदार पद्धतीने वर्धापन दिन सोहळा साजरा केला. पुष्प अर्चन सोहळ्यानंतर विविध रंगीय सुवासिक फुलांनी गाभारागृह भरून गेले. हजारो भाविकांनी त्यानंतर मनोभावे दर्शन घेतले. दुपारी श्री शंभू महादेवांना नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक अभिषेक काळे यांच्या स्वरसोहम या सुश्राव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री विरुपाक्ष महादेव मंदिरामध्ये प्रसाद कर्वे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यनेमाने उपासना करणाऱ्यांनी एकत्र येत सेवा समूह स्थापन केला आहे. सेवा समूह व मंदिर विश्वस्त यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्षी लक्ष पुष्प अर्चन सोहळ्याच्या माध्यमातून श्री शंभू महादेव सेवा करण्यात आली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!