नवी मुंबईमध्ये रंगणार भक्ती आणि शुभाशीर्वाद यांचा अलौकिक सोहळा
पनवेल दि.१४: नवी मुंबई मधील खारघर येथे इस्कॉनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री श्री राधा मनमोहनजी मंदिराचे उद्घाटन अध्यात्मिक वातावरणामध्ये संपन्न होणार आहे. हा सोहळा ९ ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समाजाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मैलाचा दगड ठरावा अशा स्वरूपाचे हे मंदिर झालेले असून त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात सन्माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते कल्चरल सेंटर आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे अवशेष सांभाळणाऱ्या “वेदिक म्युझियम” चे भूमिपूजन देखील होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. 15 जानेवारी रोजी श्री श्री राधा मनमोहनजी मंदिराचे महा लोकार्पण संपन्न होणार आहे. इस्कॉन से संस्थापक आचार्य महाप्रभू भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या माध्यमातून जगभरात इस्कॉन मंदिरांचे जाळे पसरले आहे. सगळ्यांसाठी खुल्या असणाऱ्या या मंदिरांमध्ये आध्यात्मिक संपूर्णतेची अलौकिक अनुभूती येते. इस्कॉनच्या माध्यमातून अत्यंत पवित्र अशा गुरुपरंपरा, वैश्विक बंधुता तसेच शांती प्रेम आणि सद्भावनेचा संदेश दिला जातो. खारघर येथे उभारण्यात येणारे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर हे महाराष्ट्रासाठी एक गौरव ठरेल. या ठिकाणी पारंपारिक वेदिक अभ्यासक्रम शिकविण्यासाठी महाविद्यालय, भक्तीवेदांत वाचनालय, आयुर्वेदिक उपचार पद्धती युक्त वैद्यकीय सेवालय, गोशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम, वेदिक वस्तुसंग्रहालय, ऑरगॅनिक शेती, कल्चरल सेंटर अशा अनेक सुविधा असणार आहेत. सदरच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये अनेक उत्तमोत्तम धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. संपूर्ण आठवड्यात भक्तीपूर्ण वातावरणामध्ये भजन, किर्तन यांचे सादरीकरण होईल. सोहळ्यामध्ये वेदिक परंपरेनुसार आठ आचार्य आणि दहा प्रमुख दैवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अन्य अध्यात्मिक कार्यक्रमांच्यात वैष्णव समागम, नाटिका, भजन संध्या, किर्तन मेळा असे कार्यक्रम रंगतील. सोहळ्ळ्या दरम्यान रोज येणाऱ्या सगळ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील केलेले आहे. नूतन मंदिराच्या उद्घाटना समवेत वेदिक म्युझियम आणि कल्चरल सेंटर यांचे भूमिपूजन होईल.
मंदिराचे अध्यक्ष एच जी सूरदास म्हणाले की एखाद्या मरुद्यानप्रमाणे नवी मुंबईच्या निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर खुलून दिसेल. अध्यात्म आणि भक्ती यांची अनुभूती घेण्यासाठी सगळ्यांसाठी हे मंदिर खुले असून सुदृढ समाज निर्मितीच्या दृष्टीने समाजाची सेवा करण्यासाठी हे भक्तिमय ठिकाण निर्माण करण्यात आले आहे. अध्यात्मिक वातावरणामध्ये शांती, विश्वास आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या मंदिरात कुणीही येऊ शकत. जात पात धर्म पंथ न पाळता सगळ्यांसाठी या मंदिरातील अध्यात्मिक कार्यक्रम आणि सेवा खुले असतील.
उद्घाटन सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी उपासना बागला यांच्याशी ७५०६५१३०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.