पनवेल दि.२५: पनवेल महापालिकेत काम करणार्या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.
या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता.
पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी महापालिकेत समावेश व्हावा अशी मागणी सातत्याने लावून धरली होती, मात्र जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यानेे समावेशन प्रकियेला लांबली. यासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला याबाबत 25 जानेवारी 2019 रोजी अहवाल दिला. हा अहवाल सादर करूनही नव्या सरकारकडून निर्णय प्रलंबित असल्याने कर्मचार्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे या कर्मचार्यांनी आंदोलनेही केली. अखेर 288 कर्मचार्यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यास नगरविकास खात्याने सोमवारी दिनांक 23 मंजुरी दिली. त्यामुळे या कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समावेशन झालेल्या कर्मचार्यांच्या प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना पेढे भरवून धन्यवाद दिले. आपल्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची नम्र भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. नगरसेवक नितीन पाटील, म्युन्सिपल एम्प्लॉइज युनियनचे अॅड. सुरेश ठाकूर व सहकारी उपस्थित होते.