पनवेल दि.२६: पनवेल महानगरपालिकेच्या 408 कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून, महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.
पनवेलमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी 408 कोटींची अमृत पाणीपुरवठा योजना महापालिकेने आखली आहे, मात्र सुरुवातीला कार्यरत असलेल्या अधिकार्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना मागील चार वर्षांपासून तांत्रिक अडचणीत अडकली होती. या संदर्भात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वेळोवेळी शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले तसेच पाठपुरावाही केला होता. दरम्यान, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख व विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सचिवालयात हा विषय मांडला. या सर्व प्रयत्नांना यश येऊन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या नस्तीला गती मिळाली आहे. या कामाचा कालावधी 30 महिन्यांचा आहे. यासाठी जेव्हीपीआर या कंपनीची निवड करण्यात आली असून, 247 कोटी रुपयांची विविध कामे पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत.
असे मिळेल पाणी
या योजनेमुळे 228 दश लक्ष लीटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून पनवेलला होणार आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर पनवेल महापालिकेला यातील 100 एमएलडी, एमएमआरडीए क्षेत्राला 19, जेएनपीटी बंदराला 40, तर सिडको वसाहतींना 69 एमएलडी पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिका व इतर प्राधिकरणांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.