पुरुष खुला गटात मृणाल सरोदे तर महिला खुला गटात अर्चना जाधव यांनी पटकावला विजेतेपदाचा किताब
पनवेल दि. १४: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन पार पडलेल्या ‘नमो खारघर मॅरेथॉन २०२४’ स्पर्धेत तब्बल १९ हजार ६०१ स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही मॅरेथॉन उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यतची रेकॉर्डब्रेक करणारी हि मॅरेथॉन ठरली. या स्पर्धेतील पुरुष खुला गटात मृणाल सरोदे तर महिला खुला गटात अर्चना जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावित विजेतेपदाचा किताब पटकावला.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉनने आतापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड यावेळी मोडले. खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०५ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या मॅरेथॉनला स्पर्धेचे मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, सेलिब्रिटी जया जुगल परमार, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, यांच्यासह विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली. यंदाचा सहभाग सर्वात जास्त असल्याने आयोजकांकडून या सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यंदाची हि स्पर्धा १४ वी होती. स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, अशा गटात मॅरेथॉन झाली. विजेत्या स्पर्धकांना रक्कम स्वरूपात तसेच मेडल, सर्टिफिकेट आदी बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, स्वयंसेवक, बक्षिस वितरण अशा विविध समित्या कार्यरत होत्या. यावेळी सर्व स्पर्धकांसाठी बिस्किटे, पाणी, ओआरएस एनर्जी ड्रिंक आयोजकांकडून मोफत देण्यात आले होते. त्याचबरोबर मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध प्री इवेंट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या झुम्बा डान्सचा स्पर्धक आणि क्रीडा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. या मॅरेथॉनमध्ये विविध सामाजिक हिताचे संदेश देणाऱ्या शाळा, सोसायटी, संस्थांचा सहभाग लक्षवेधी होता. नियोजन व शिस्तबद्व अशा या मॅरेथॉनची उत्सुकता वर्षभर लागून राहिलेली असते दिवाळी संपल्यावर या मॅरेथॉनचे वेध स्पर्धक आणि क्रीडारसिकांना लागलेले असतात. त्यामुळे हि मॅरेथॉन एक पर्वणी असते. त्यामुळेच राज्यातील नामवंत अशा या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभत असतो. विशेष म्हणजे लहानग्यांपासून युवा, ज्येष्ठांचा यामध्ये सहभाग होता. त्यामध्ये ९३ वर्षाचे विजय श्रीरंग यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
या स्पर्धेला खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, संजय भगत, समीर कदम, युवा नेते समीर कदम, पनवेल शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष सुमित झुंझारराव, अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल, दीपक शिंदे, रमेश खडकर, विनोद घरत, गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, अजय माळी, किरण पाटील, विपुल चौटालिया, सचिन वास्कर, ऍड. इर्शाद शेख, संतोषकुमार शर्मा, यांच्यासह विविध संस्था, संघटना, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.