आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पनवेल दि.२४: पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-२ मध्ये राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तर १० लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडला. दरम्यान, पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २३७ लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिनिधिक स्वरूपामध्ये मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
अन्न वस्त्र निवारा या मानवी गरजा आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे झाली तरी अद्यापही अनेकांना या मूलभूत गरजा मिळालेल्या नाहीत. लाखो कुटुंब भाडेतत्त्वावर घर घेऊन राहतात. तर अनेकांना सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करावे लागते. प्रत्येकाला आपल्या स्वतःचे घर मिळावे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना घर देण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारने आखले आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घरे बांधून ते गरीब गरजूंना देण्यात आले आहेत. शनिवारी पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन मधील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. त्यापैकी दहा लाख जणांना पहिला हप्ता देण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच गावागावात लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, गटविकास अधिकारी समित वाठारकर, वन अधिकारी एम.डी. राठोड, विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी लाभार्थी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!