माथेरान दि.26 (मुकुंद रांजणे) रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार केला असून माथेरान मध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पर्यटकांची संख्या तुरळक दिसत असून कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडताना दिसत नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग कार्यरत दिसत आहे. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. पडलेली झाडे बाजूला करून रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण नाही याची काळजी कार्यक्षम प्रशासक राहुल इंगळे घेत आहेत. दि.२५ रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत 96.0 मी.मी पावसाची नोंद झाली. एकूण पाऊस 233.0 mm असून सुरुवातीपासून 2934.0 mm इतक्या पावसाची नोंद पर्जन्यमापन कर्मचारी अन्सार शेख यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे काही विपरीत घटना घडू नयेत यासाठी ज्यांची घरे कड्यालगत आहेत त्यांना अगोदरच नोटिस बजावून सुरक्षित स्थळी जाण्याचे नगरपरिषदेच्या वतीने सूचित करण्यात आले. पावसामुळे विजेचा लपंडाव सुरूच असून नळाला घरगुती पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत पावसाने रुद्र रूप धारण केल्यामुळे मागील २६ जुलैची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती सुध्दा नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.