अलिबाग, दि.18 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार संपूर्ण राज्यात दि. 3 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता तेथील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणारे धान्य दुकानदार, मेडीकल स्टोअर्स, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदींची तात्काळ करोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पनवेल मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील ज्या दुकानदारांची करोना चाचणी झालेली आहे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ते बाधित नसल्याचे निश्चित केले आहे, त्याच ठिकाणाहून वस्तू विकत घ्यावी. जेणेकरून करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सहकार्य मिळेल, शिवाय नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता घरातच राहावे, शासन या घटनेबाबत गंभीर दखल घेत असून नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.