पनवेल दि.२९: लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता वीज वितरण महामंडळाकडून करण्यात आलेली अंदाजीत वाढीव वीज देयके तातडीने रद्द करून वीज ग्राहकांनी वापरलेल्याच वीजेची वीज देयके देण्यात यावी आणि सदरची वीज देयके भरण्यास मुदत देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री डॉ.नितिन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक छोटे-मोठे उद्योग वंद पडले आहेत. अशा परिस्थितीत रायगड जिल्हयात विशेषतः पनवेल तालुक्यात वीज वितरण महामंडळाने अंदाजित वाढीव वीज देयके ग्राहकांना आकारली आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक उद्योगधंदे बंद पडल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत, तर काहींना अतिशय अल्प वेतनात आपल्या कुटूंवियांचा उदरनिर्वाह करणेही कठिण होत आहे. उक्त परिस्थितीत उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्यामुळे वीज वितरण महामंडळाने पाठविलेल्या वाढीव विज देयके भरणे वीज ग्राहकांना अशक्य होणार आहे. व त्या अनुषंगाने यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.
तरी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदी लक्षात घेता वीज वितरण महामंडळाकडून करण्यात आलेली अंदाजीत वाढीव वीज देयके तातडीने रद्द करून वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीजेची वीज देयके देण्यात यावी व सदर वीज देयके भरण्यास मुदत देण्यात यावी, अशी मागणी करून वीज ग्राहकांच्या समस्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.