महानगरपालिकेच्या चार शववाहिन्या नागरिकांच्या सेवेत दाखल
पनवेल,दि.5 : पनवेल महापालिकेच्यावतीने महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी चार शववाहिनी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून दिनांक 1 ऑक्टोबर रोजी या शववाहिनींचा लोकार्पण सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोर आमदार प्रशांत ठाकूर , नगरपरिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, आयुक्त गणेश देशमुख, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
या लोकार्पण कार्यक्रमास महापालिका भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त वैभव विधाते, लेखा परिक्षक निलेश नलावडे, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वेळेत शववाहिनी उपलब्ध न झाल्याने अनेकदा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगरसेवक यांनीही महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीसाठी एक शववाहिका खरेदी करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीसाठी एकअशा चार शववाहिनीची खरेदी केली असून आता त्या सेवेत दाखल केल्या आहेत. सुरूवातीची एक शववाहिका व नवीन चार अशा 5 शववाहिका आता महापालिकेच्या ताफ्यात आहेत. या शववाहिका महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना महापालिका हद्दीमध्ये मोफत सेवा देणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये जाहिर केले आहे. तसेच त्या पालिका क्षेत्राबाहेर नेणाऱ्यास माफक दरात सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी शववाहिकेसाठी महापालिकेच्या 022-27458040/41/42 या क्रमांकावरती संपर्क साधवा.
महापालिकेच्यावतीने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना नेहमीच उत्तम आरोग्य् सेवा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. महापालिकेच्यावतीने सध्या 12 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व चार आरोग्य वर्धिनी कार्यरत आहे. त्याचबरोबर नागरिकांना रूग्णवाहिकांच्या सेवेतही वाढ करण्यात आली असून वाहन विभागामध्ये सध्या 6 रूग्णवाहिका आहेत.