केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार गणेश नाईक, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार उपस्थिती
पनवेल दि.४: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. यंदा हा १५ वा महाआरोग्य शिबीर असून या महाशिबिराचे उदघाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश नाईक हे असणार असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सन्माननिय उपस्थिती तर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी ०९ ते सायंकाळी ०२ वाजेपर्यंत होणार आहे. या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, हाडांचे रोग, ईसीजी, मधुमेह, नाक-कान-घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफतही देण्यात येणार आहे. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र देण्यात येणार आहे. यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड सुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे.
या महाशिबिरात जे. जे. हॉस्पिटल मुंबई, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ, भारती विद्यापीठ खारघर, मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हिट सेंटर पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल, सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचा सहभाग असणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत यांनी केले आहे.