पनवेल, दि.30: 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो, आ अपंग दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेचे 3 डिसेंबर रविवार रोजी नवीन पनवेल येथील बांठीया स्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगाना प्रोत्साहन मिळावे याकरिता दिव्यांगाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेदरम्यान त्यांना कुठेही गैरसोय होऊ नये याची खबरदारी संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. सर्व समित्यांना दिलेल्या जबाबदा-या यशस्वीरित्या पार पाडाव्यात असे सदर बैठकी दरम्यान सर्व समिती सदस्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या शाळा या स्पर्धेमध्ये सगभागी होणार आहेत. जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातून एकूण 16 दिव्यांग शाळा सहभागी होणार असून त्यांचे 4 गटामध्ये स्पर्धेसाठी विभाजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बौद्धिक अक्षम (मतिमंद) 6 ते 12 वयोगट, 13 ते 16 वयोगट, 17 ते 21 वयोगट, 22 ते 25 वयोगट यांच्यासाठी धावणे, स्पॉट जंप, सोफ्ट बॉल थ्रो, गोळा फेक, लांब उडी हे खेळ खेळण्यात येणार आहेत. प्रवर्ग कर्णबधिर वयोगट 6 ते 12, 13 ते 16, 17 ते 21, 22 ते 25 यांच्यासाठी धावणे, लांब उडी, गोळा फेक या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून सुमारे 250 दिव्यांग क्रीडा स्पर्धक विद्यार्थी व 150 शिक्षक व कर्मचारी वर्ग या स्पर्धेमध्ये सहभागी राहणार आहेत.
या वर्षी विशेष बाब म्हणजे बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाच्या खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी शामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजनाची जबाबदारी नवीन पनवेल येथील डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाऊंडेशनच्या बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेकडे सोपविण्यात आली आहे. तरी या आगळ्यावेगळ्या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहून दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन करावे असे आवाहन डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. तसेच 4 डिसेंबर रोजी पालकांकरता मार्गदर्शनपर व्हिडिओ पाठवणे, 5 डिसेंबर रोजी जनजागृती रॅली, ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करणे, ७ डिसेंबर रोजी माहितीपत्रके वाटप व जनजागृती करणे आणि तारा गाव येथील युसुफ मेहेर अली सेंटरला भेट, 10 डिसेंबर रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!