नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्र वाढवा; खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरु करा – सभागृहनेते परेश ठाकूर
पनवेल दि.२६: महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावेत, तसेच खांदा कॉलनी मध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी तर खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले.
सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड- १९) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून, सदरील विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, याच धर्तीवर सदरील विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये, याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्यती कायदेशीर उपाययोजना केली जात आहे. मात्र पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाढत्या कोरोना रुग्णांची सद्यस्थिती पाहता रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर नवीन पनवेल येथिल लसीकरण केंद्रावर दिवसाला १०० ते १२५ नागरीकाचे दैनंदिन लसीकरण करण्यात येत आहे. परंतु केंद्राबाहेर दर दिवशी ३०० ते ४०० नागरीकांची गर्दी दिसून येते. त्यामध्ये फक्त १०० ते १२५ नागरीकांचे टोकन मिळून फक्त त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरीत नागरीकांना टोकन न मिळाल्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण होत आहे. सदर उद्भवणाऱ्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत नवीन पनवेल परिसरात दोन लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरुन नागरीकांना लसीकरण करण्याकरीता होणारा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागणार नाही. तसेच नागरीकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकामी लसीकरण करण्याकरिता प्रोत्साहित करणे. जेणेकरून कोरोना बाधित रुग्णांना त्यापासून वेळेत उपचार घेता येतील त्याचप्रमाणे नागरीकांची गैरसोय होणार नाही व नागरीकांना त्यापासून आधार मिळेल.त्याचबरोबर खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र नसल्यामुळे नागरिकांना पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल येथे लसीकरणासाठी जावे लागत आहे, त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक भुर्दड, व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरु करावे, असेही सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!