पनवेल दि.२९: दीपावली हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. हा उत्सव सोमवार २८ ॲाक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या दिवशी सुरू होऊन रविवार ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज सणाचे संपन्न होतो.
दीपावलीचा सण साजरा करताना पर्यावरणाचे भान आपण ठेवूया. ध्वनिप्रदूषण , वायूप्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेऊया. आपण आनंद घेऊया आणि इतरांच्या जीवनातही आपण आनंद फुलवूया. दीपावली सणामधील प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त आपण जाणून घेऊया.
(१) सोमवार २८ ॲाक्टोबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने या दिवशी गोवत्स द्वादशी , वसुबारस साजरी करावयाची आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर गाय आणि वासरू यांची पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य खायला द्यायचा आहे. भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती असल्याने आपण दीपावलीचा आनंदोत्सव साजरा करण्याअगोदर गाय- वासराची पूजा करून त्यांच्याविषयी आदर प्रकट करावयाचा आहे.
(२) मंगळवार २९ ॲाक्टोबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने या दिवशी धनत्रयोदशी आहे. याचं दिवशी धन्वंतरी पूजन करावयाचे आहे. या दिवशी गरीबाना दीपदान, वस्त्रदान आणि अन्नदान करावयाचे आहे. गरीबांना दीपावलीचा सण आनंदाने साजरा करता यावा हा यामागचा उद्देश आहे. या दिवशी सकाळी ९-३१ ते १०-५७ चल, सकाळी १०-५८ ते १२-२३ लाभ, १२-२४ ते १-४९ अमृत किंवा ३-१५ ते सायं. ४-४१ शुभ चौघडीमध्ये व्यापारी हिशोबाच्या वह्या आणाव्यात.
(३) बुधवार ३० ॲाक्टोबर रोजी दीपावलीचा कोणताही सण नाही.
(४) गुरुवार ३१ ॲाक्टोबर रोजी चंद्रोदयाच्यावेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशीचा सण साजरा करावयाचा आहे. या दिवशी चंद्रोदय पहाटे ५-२८ वाजता आहे, सूर्योदय सकाळी ६-४० वाजता आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. सुगंधी तेलाने, उटण लावून मसाज करावा. नंतर उष्णोदक पाण्याने स्नान करावे याला अभ्यंगस्नान म्हणतात. अभ्यंगस्नान केल्याने स्नायू बळकट होतात. त्वचा कांतिमान होते.
(५) शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली आश्विन अमावास्या असल्याने याचं दिवशी सायं. ६-०४ ते रात्री ८-३५ या प्रदोषकालात लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे.या दिवशी अभ्यंगस्नान आणि अलक्ष्मी निस्सारण करायचे आहे. झाडूची पूजाही करावयाची आहे. याच दिवशी श्रीमहावीर निर्वाण दिवस आहे.
(६) शनिवार २ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा सण आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करतात. तसेच शुभ कार्याचा प्रारंभ करतात. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. या दिवशी विक्रम संवत् २०८१ अनलनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याच दिवशी महावीर जैन संवत् २५५१ चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजा करावयाची आहे. या दिवशी सकाळी ८-०६ ते ९-३१ शुभ, दुपारी १२-३१ ते दुपारी १-४६ चल, दुपारी १-४७ ते ३-११ लाभ किंवा दुपारी ३-१२ ते ४-३६ अमृत चौघडीमध्ये वहीपूजन आणि वहीलेखन करावयास उत्तम मुहूर्त आहे.
(७) रविवार ३ नोव्हेंबर या दिवशी यमद्वितीया , भाऊबीज सण आहे. बंधू- भगिनीचे प्रेम जिव्हाळा वृद्धिंगत करणारा हा सण असतो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण त्याला ओवाळते, भाऊ तिला भेटवस्तू देतो.
भाऊबीजेच्या सणाने दीपावली उत्सव संपन्न होत असतो.
दिवाळीचा सण आपण साजरा करतो. अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती यांचा अंधार दूर होऊन ज्ञान , उद्योगीपणा, स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोण, नीती यांचा प्रकाश सर्वत्र पसरो अशी आपण प्रार्थना करूया. तसेच हा दीपावलीचा सण साजरा करता पर्यावरणाचे भान ठेवून आपण इकोफ्रेन्डली दीपावली उत्सव साजरा करूया.
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)
