मुंबई, दि. 20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
प्रा.गायकवाड पुढे म्हणाल्या, बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल. वर्ग 9 वी आणि 11 वी ची उर्वरित परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येईल. वर्ग दहावीचे दोन पेपर जे येत्या शनिवारी आणि सोमवारी आहेत ते वेळापत्रकाप्रमाणे होतील. दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.