नवी दिल्ली दि.१९: कोरोना व्हायरस म्हणजेच सीओव्हीआयडी-19 संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ आयोजित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने जनतेसाठी आयोजित केलेला कर्फ्यू. जनता कर्फ्यू काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे. समाजात जाऊ नये. जे केवळ अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक आहेत त्यांनीच केवळ घराबाहेर पडावे. हे आपल्या आत्मसन्माची गोष्ट आहे. आत्मसन्मान ही देशभक्तीच आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे अवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आज सायंकाळी संबोधीत केले या वेळी ते बोलत होते.
‘कोविड १९ टास्क फोर्स’
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड १९ इकॉनॉमिक टास्क फोर्स बनवण्यात येत आहे, असंही जाहीर केलं. ही टास्क फोर्स, आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी उचलण्यात येणारी पावलं आणि त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुनिश्चित करेल, असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.