अलिबाग,दि.9 : करोना रूग्ण स्वॅब तपासणी संदर्भात रायगड जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असून आता रायगडकरांना स्वॅब तपासणी अहवालाकरिता प्रतिक्षेची गरज भासणार नाही.
अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयातच आता करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज शासनाने निर्गमित केला आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खाजगी उपक्रम यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या चिकाटीमुळे जिल्ह्यासाठी प्रयोगशाळा मंजूरीचे हे यश प्राप्त झाले आहे. या लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हास्तरावरच वेळेत मिळण्यासाठी उपयोग होणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा रूग्णालय येथे ही लॅब मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला हाेता. आज त्यास यश मिळाले असून यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
