पनवेल दि.२३: केंद्र सरकारचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा मनोज सोनार हिच्या लघुपटाला नामांकन मिळाले आहे.
दीक्षा सोनार ही सीकेटीत विज्ञान शाखेत इयत्ता बारावी तुकडी-1मध्ये शिकत असून, तिने क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसीए) एक शाप या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. विद्यार्थी गटातील या लघुपटासाठी इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळाले आहे.
या लघुकथा स्क्रिप्टचे लेखन सीकेटीतीलच इयत्ता बारावी विज्ञान तुकडी 1मधील ओम सुर्वे याने केले आहे. विशेष म्हणजे इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये पोर्तुगाल, इटली, रशिया आदी देशांतून विद्यार्थी गटामध्ये लघुकथा आल्या होत्या. त्यातील 10 लघुकथांना नामांकन मिळाले आहे. याद्वारे दीक्षा व ओम यांनी आपली छाप पाडली आहे.
या देदीप्यमान यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी मंडळ, प्राचार्य इंदू घरत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी दीक्षा सोनार व ओम सुर्वे यांचे कौतुक व अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला विद्यार्थ्यांनी संवाद
इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलचे मंगळवार दि. 22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांनी नामांकनप्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एकूण आलेल्या लघुकथांमधून 10 लघुकथांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा सोनार हिच्या लघुकथेचाही समावेश आहे. यातून प्रथम तीन लघुकथा अंतिमत: निवडण्यात येणार असून, त्याचा निकाल शुक्रवार दि. 25 रोजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू जाहीर करणार आहेत.