मुख्यमंत्र्याच्या हस्ते ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांचा सत्कार
मुंबई, दि.7: जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!