पनवेल दि.17: बॅंक ठेवीदारांसाठी विम्याच्या संरक्षणाची रक्कम एक लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेतील ठेवीदारांना आता झाला आहे. जर बॅंक बुडाली तर बॅंकांमध्ये ठेवी ठेवणाऱ्या सामान्य नागरीकाला आधार मिळावा म्हणून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेतील सामान्य ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाळा बॅंक घोटाळ्यानंतर मे २०१९ पासून बॅंकेतील सामान्य ठेवीदारांना कर्नाळा बॅंकेकडून पैसेच मिळत नव्हते. कर्नाळा बॅंकेचे ठेवीदार हतबल आणि हताश झाले होते. आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समिती स्थापन झाली आणि त्यांनी माजी खासदार किरीट सोमैया यांना या बाबत मदतीसाठी पाचारण केले. सोमैया यांच्या नेतृत्वाखाली मागणी, मोर्चे, आंदोलन, पाठपुरावा करण्यात आला. तसेच वर्षानुवर्षे अनेक बॅंकातील ठेवीदारांना त्यांचे पैसेच परत मिळाले नव्हते. त्यामुळे किरीट सोमैया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन हा परिस्थिती मांडली आणि मार्ग काढण्याचा आग्रह धरला. सोमैया यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला.
तसेच, कर्नाळा बॅंक घोटाळा प्रकरणात राज्यातील पोलिसांकडून कोणालाही अटक होत नव्हती. किरीट सोमैयांच्या पाठपुराव्यामुळे ‘ईडी’ने विवेक पाटील यांना अटक केली. गेले आठ महिने विवेक पाटील तळोजा जेलमध्ये जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत. कर्नाळा बॅंकेवरही अवसायक नेमण्याची कारवाई होत नव्हती. त्याबाबतही किरीट सोमैया यांनी कर्नाळा बॅंक अवसायानात काढण्याचा रिझर्व्ह बॅंकेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे कर्नाळा बॅंक अवसायानात निघाली. त्यापूर्वीच पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून विम्याच्या संरक्षणाची रक्कम वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
