[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2020/02/photo-22-scaled.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true]

पनवेल दि.२६: जगात बोेलणार्‍या भाषांमध्ये मराठी भाषेला मानाचे स्थान असून मराठी भाषिक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे ती माणसाला मोठेच बनवते असे मत सुप्रसिध्द साहित्यिक व कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल मराठी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्यावतीने महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर होते तर प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री नयन पवार, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, अ‍ॅड. चंद्रकांत मढवी, कवियत्री जोत्स्ना रजपूत, स्मिता गांधी, मंदाकिनी हांडे, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रा.लांडे सोनू, प्रा. प्रविण गायकर आदी उपस्थित होते. यापुढे बोलताना अरूण म्हात्रे यांनी, मराठी भाषा दिन हा अभिमान जागवण्याचा दिवस आहे. मराठी साहित्यात वि.वा.शिरवाडकर यांचे नाव अजरामर आहे, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जेष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या सुचनेवरून मराठी भाषा दिन साजरा करण्याची सुरूवात झाली. अक्षराच्या दुनियेत आजच्या तरूण पिढीने जर झोकून दिले तर त्यांची भविष्यातील स्वप्नं पूर्ण होतील. पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनाने संस्कार होतात. उत्तम भाषा ही उत्तम संवाद घडू शकते. 12 वी पर्यंत मातृभाषा शिकविली पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2020/02/photo-11-scaled.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true]

सुप्रसिध्द अभिनेत्री नयन पवार यांनी, कुसुमाग्रजांचे साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. मायबोलीचा अभिमान, आदर केला पाहिजे. मराठी ही गोड भाषा आहे. समृध्द मराठी भाषेने अनेकांची स्वप्नेे उंचावली आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आवडीने मराठीचे वाचन करावे असे आवाहन त्यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे नवीन पनवेल शाखेचे गणेश कोळी यांनी, मुलांना इंग्रजी बरोबरच मराठी भाषेचे ज्ञान द्या. यातून मराठी भाषा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, जीवन जगण्यासाठी कविता, साहित्य स्फूर्ती देतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कवींचे साहित्य प्रेरीत करते. अनेकांना जीवनात अडचणी येतात तेव्हा कविता प्रेरणादायी ठरतात. समाजात चांगल्या साहित्याची निर्मिती होत असताना तरूणांनीही साहित्य लिहिले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रविण गायकर यांनी केले. उपस्थितांचे आभार मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. सोनू लांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!