आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे तसेच ऑक्सिजन पार्क दत्तक देऊन रुजविले पर्यावरण संवर्धनाचे मूल्य !
पनवेल दि.२६: आदर्श शैक्षणिक समूहाचे श्री.बापूसाहेब डी. डी.विसपुते बी.एड.महाविद्यालयात नेहमीच समाजोपयोगी व विविध स्तुत्य उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे बी.एड.च्या समाजसेवा शिबिरांतर्गत विविध पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वाकडी येथील आश्रम शाळेच्या परिसराची स्वच्छता, वाकडी गावातील विविध मंदिराच्या परिसराची स्वच्छता, ऑक्सिजन पार्कची निर्मिती व आश्रमशाळेतील ५ मुलींना ऑक्सिजन पार्क दत्तक, वृक्ष लागवड आणि विद्यार्थ्यांना झाडे दत्तक, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे भित्तीपत्रक सादरीकरण व ही भित्तिपत्रके शाळेला भेट, २०० विद्यार्थ्यांना ज्ञानपेटीतील शैक्षणिक साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांसाठी आरोग्याशी संबंधित व्याख्यानाचे आयोजन, मुलींसाठी कायदेशीर बाबींचे ज्ञान देणारे व्याख्यान, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम असा बहुढंगी व बहुरंगी उपक्रम दि.२२ व दि.२३ फेब्रुवारी रोजी वाकडी येथील आश्रम शाळेत पार पडला .” एक कदम स्वच्छता की ओर ” या विचाराने प्रेरित होऊन आदर्श शिक्षण संस्थेचे श्री. बापूसाहेब डी .डी.विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल येथील छात्राध्यापकांचे समाजासमवेत कार्य शिबीर कुष्ठरोग निवारण समिती आश्रमशाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक बांधिलकी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. यावेळी आदर्श समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते व संचालिका संगिता विसपुते यांच्या शुभहस्ते हे ऑक्सिजन पार्क व वृक्ष विद्यार्थ्यांना दत्तक देण्यात आले तसेच ज्ञानपेटीतील शैक्षणिक साहित्य २००विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले,शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले, गावाची व परिसराची स्वच्छता, आरोग्याचे व कायदेशीर बाबींवर व्याख्यान, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सोबतीला स्वतः बनवलेले जेवण यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजविता आले. कार्यक्रमास धनराजजी विसपुते, संगिता विसपुते, अॅड.प्रमोद ठाकूर, वाकडीच्या सरपंच पुजा पाटील, मुख्याध्यापक अनिरुद्ध आदमाने, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. सीमा कांबळे, बी. एड. विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.