महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय
पनवेल, दि.३० : कारोना बाधितांच्या वाढत्यासंख्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलिस विभाग यांच्याव्दारे करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलिस परिमंडळ २ चे उपायुक्त शिवराज पाटील मार्गदर्शनाखाली संयुक्त ऑनलाईन बैठक घेण्यात आली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या आस्थापना, हॉटेल्स, गृह निर्माण सोसायट्या, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने अशांवर पोलिस विभागाची मदत घेऊन कडक कारवाई करण्याविषयी निर्देश दिले. तसेच कोरोनासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन नागरिक करताना दिसत नाही. अशा नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
मागील कोरोना परिस्थिती आणि आताची परिस्थिती यांमध्ये फरक आहे. नागरिकांमध्ये कोरोनाविषयी भीती राहिली नसल्यामुळे नागरिक कोरोनाच्या नियमाचे पालन करताना दिसत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची अजूनही रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन करत असलेल्या कारवाईस, पोलिस प्रशासन पुरेपूर मदत करेल असे आश्वासन पोलिस परिमंडळ २ चे उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिले.
बैठकीस अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, प्रभाग अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खारघर येथील शत्रुघ्न माळी, तळोजा येथील काशीनाथ चव्हाण, कळंबोली येथील संजय पाटील, कामोठे येथील स्मिता जाधव, खांदेश्वर येथील देविदास सोनावणे, पनवेल शहर येथील अजयकुमार लांडगे उपस्थित होते.