पनवेल दि.६: आपला देश एकसंघ राहिला पाहिजे हि भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली असून समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा आरसा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे आज केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तू नवले, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांना स्व. ल. पा. वालेकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना स्व. शशिकांत गडकरी स्मृती जीवन गौरव पुरस्कार,दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांना स्व. भरत कुरघोडे स्मृती जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार सुनिल पोतदार यांना स्व. मधुकर दोंदे स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ऊन, पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या आणि वृत्तपत्राचा दर्जा वाढविण्यासाठी हातभार लावणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सर्व गौरवमूर्तींचा नामोल्लेख करत त्यांच्या कार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला. तसेच या नियोजनबद्ध कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदनही केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, खजिनदार केवल महाडिक, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, साहिल रेळेकर, अनिल भोळे, शेखर भोपी, विवेक पाटील, अनिल कुरघोडे, गणपत वारगडा, विशाल सावंत, संतोष भगत, मयूर तांबडे, रवींद्र गायकवाड, राजेश डांगळे, प्रवीण मोहोकर, वचन गायकवाड, दीपक घोसाळकर, अरविंद पोतदार, शशिकांत कुंभार, संतोष सुतार, भरतकुमार कांबळे, सुभाष वाघपंजे, सुनील कटेकर, राकेश पितळे, हरेश साठे, लक्ष्मण ठाकूर, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कायदेशीर सल्लागार ऍड. मनोहर सचदेव आदी पत्रकारांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.