पनवेल दि.५: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘ ब्रम्हास्त्र ‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी रात्री पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. स्पर्धेत ‘सुंदरी’ या एकांकिकेने द्वितीय, ‘निरुपण’ तृतीय, ‘ठसका’ चतुर्थ, तर उत्तेजनार्थ बक्षीस ‘बिराड’ एकांकिकेने प्राप्त केला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नाट्यचळवळ वृदिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे जावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे ही स्पर्धा कोकण व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली, तसेच बक्षिसांच्या रकमेतही भरघोस वाढ करण्यात आली. पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व निर्माता प्रसाद कांबळी, सन्माननीय अतिथी म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, प्रदीप कबरे, भरत सावले, अभिनेत्री शर्वानी पिल्लई, नाट्य निर्माते दिगंबर प्रभू, सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर, नाट्य परिषद कार्यवाह श्याम पुंडे, उद्योजक विलास कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाअंतिम सोहळ्यास भेट देऊन कलाकारांचा उत्साह वाढविला.