जळगाव दि.७ : वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आमदारकीची निवडणूक लढवण्याची संधी पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीला देण्यात आली आहे.
शमिभा पाटील या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मागील १५ वर्षांपासून शमिभा पाटील तृतीयपंथींसह आदिवासी व भटक्यांच्या हक्कासाठी लढत असून, पाच वर्षांपासून त्या वंचित बहुजन आघाडीचे काम करीत आहेत.
शबनम मावशी पहिल्या खासदार
भारतात तृतीयपंथींना १९९४ मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला होता. तीस वर्षांपूर्वी १९९८ ते २००३ या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मावशी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या.