कळंबोली दि.१३: राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यालयीन कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे लाखो शिक्षकेतर कर्मचारी राज्यात कार्यरत आहे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे शिक्षकेतर कर्मचारी संघटना १५ नोव्हेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. कर्मचारी संघटनेच्या महामंडळाच्या स्थापनेचे स्मरण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यरत व्हावे याकरिता १५ नोव्हेंबर हा शिक्षकेतर दिन साजरा करायचा निर्णय संघटनेने घेतला आहे. तरी राज्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने १५ नोव्हेंबर रोजी शिक्षकेतर दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्याचे आवाहन शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे महासचिव मिलिंद बाळकृष्ण जोशी यांनी केले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी हा वर्ग शालेय प्रशासनातील महत्त्वाचा दुवा म्हणून समजला जातो. शाळा, संस्था व शासन यामधील कार्यालयीन कामकाजामधील हृदय म्हणून समजला जाणारा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हा आपली कामगिरी चोख बजावत असतो. परंतु त्याच्या दैनंदिन कामकाजामधील येणाऱ्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळ गेली अनेक वर्ष करीत आहे.शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या महामंडळाची स्थापना १५ नोव्हेंबर १९६७ रोजी झाल्याने या दिवसाचे स्मरण हे राज्यातील सर्व कर्मचारी संघटने वर्गात कायमचे तेवत राहावे याकरता या दिवशी माध्यमिक शाळांतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शिक्षकेतर कर्मचारी दिन उत्साहात साजरा करावा. आपल्या शाळेचे महत्वाचे घटक असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी आपल्या शालेय स्तरावर शिक्षकेतर दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करावा.
त्यासाठी शाळांतून सेवानिवृत्त झालेले शिक्षकेतर कर्मचारी,विशेष सन्मानपात्र कर्मचारी व चांगले काम करणारे शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सत्कार समारंभ आपआपल्या शाळा स्तरावर साजरा करून शिक्षकेत्तर दिन साजरा केला जावा असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष सतीश नाडगौडा, महासचिव मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विलास अत्रे यांनी केले आहे.