डोंबिवली, दि. ११ : सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि रुचकर खाद्य परंपरा असलेल्या आगरी समाजाच्या समृद्धतेची ओळख करुन देणाऱ्या डोंबिवलीतील भव्य आगरी महोत्सवाचे मंगळवारी सायंकाळी थाटात उद्घाटन करण्यात आले. यंदा उत्सवाचे विसावे वर्ष असून, आगरी महोत्सवाने समाजासाठी एक नवी दिशा व नवा विचार दिला असल्याची भावना उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.
डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ढोल ताशांच्या गजरात महोत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, शिवसेनेचे आमदार राजेश मोरे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील, गंगाराम शेलार, आशाताई पाटील, नंदू म्हात्रे, सुरेश जोशी, बंडू पाटील, कविता गावंड, संजय पावशे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी स्वागत केले. या वेळी कनसा या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.तसेच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला.
एकेकाळी आगरामध्ये वावरणाऱ्या आगरी समाजातील तरुण-तरुणींबरोबरच कलाकार व व्यावसायिकांना आगरी महोत्सवातून व्यासपीठ मिळाले. गेल्या १९ वर्षात महोत्सवाने विविध कार्यक्रमांतून नवनव्या क्षेत्राची ओळख करुन दिली. त्यामुळे या महोत्सवाच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. यापुढील काळात नव्या पिढीला आगरी संस्कृतीची ओळख करुन देण्याबरोबच संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा ध्यास घ्यावा, असे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले. यापुढील काळात आगरी समाजातील तरुणांनी शासकीय सेवेत पदार्पण करण्यासाठी मेहनत घ्यावी. त्यातून आपल्या कुटुंबाबरोबरच समाजाचाही विकास करता येईल, असे आवाहन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. आगरी समाजातील तरुणांनी विविध क्षेत्रातील व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याची गरज आहे. त्यासाठी आगरी यूथ फोरमने होतकरू तरुणांना साथीला घेऊन शासकीय कर्ज मिळवून द्यावे, अशी सूचना माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केली. तर आगरी यूथ फोरमने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करुन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक निर्माण केला होता, याबद्दल भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले. तसेच या महोत्सवाच्या व्यासपीठावरुन दरवर्षी नवा विचार व नवा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य झाले. नवनवे कलाकार, लेखक आणि व उद्योजक घडले, असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
तसेच संत स्व. सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या भव्य स्मारकासाठी कचोरे येथे १० एकर जागा मंजूर झाली असून, ते राज्यातील आदर्श प्रेरणास्थान होईल, यासाठी आगरी यूथ फोरम कार्य करणार आहे, अशी ग्वाही अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी, तर पांडुरंग म्हात्रे यांनी आभार मानले.
आगरी यूथ फोरमच्या तरुण कार्यकर्त्यांनी सुरू केलेला डोंबिवलीतील आगरी महोत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी या महोत्सवाला अधिकाधिक लोकप्रियता मिळत आहे. येत्या १७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या संमेलनात १२५ हून अधिक स्टॉल असून, आगरी समाजातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ, सुकी मासळीसह सोन्याचे दागिने आणि विविध वस्तूंची दालने मांडण्यात आली आहेत. या महोत्सवाच्या यशस्विततेसाठी अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस प्रकाश भंडारी, खजीनदार पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, दिलीप देसले, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, भानुदास भोईर, नारायण म्हात्रे, कांता पाटील, अनंता पाटील, विनायक पाटील, अशोक पाटील, सदानंद म्हात्रे, प्रवीण पाटील मेहनत घेत आहेत.