लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती व भूमिपुत्रांच्या संघर्षाला मोठे यश
पनवेल दि.२८: लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर सहमती दर्शवली आहे, त्यामुळे भूमिपुत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला मोठे यश आले आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा त्याला वाटाण्याच्या अक्षता देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता घुमजाव केला आहे. सत्ता जात आल्याचे चित्र नजरेसमोर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उशिरा शहाणपण सुचल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळाला. खरंतर ही मागणी सन २००८ पासूनची आहे. असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले आणि तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सिडकोमार्फत करून घेतला. आणि ठाकरे यांच्या या भूमिकेचा रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध केला.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी १० जूनला भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च २०२२ला भुमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारी २०२२ ला विमानतळ काम बंद आंदोलन, २४ जून २०२२ रोजी सीबीडी बेलापूर येथे सिडको घेराव अशी भव्य आंदोलने झाली. १० जून २०२१ च्या मानवी साखळी आंदोलनातून भूमिपुत्रांचा राज्य ठाकरे सरकार असंतोष स्पष्टपणे दिसून आला. तरीही बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. नामकरणासंदर्भात दिनांक २० जून २०२१ रोजी मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली होती. यावेळी ठाकरे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून उठून गेले होते. जर दिबासाहेबांच्या नावाला ठाकरे यांचा विरोध नव्हता मग त्यावेळी त्यांनी विचार का केला नाही, शब्द का दिला नाही असा सवाल उपस्थित होत असतानाच ठाकरे यांचा लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते. भूमिपुत्रांच्या विजयासाठी संघर्षाची भूमिका कायम ठेवली. दरम्यान सर्वपक्षीय लढा असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापचे नेते मात्र दिबांच्या नावासाठी पुढे आले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांनाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्यांनी दिबांच्या नावाला कायम विरोध ठेवला. मात्र आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे परंतु भूमिपुत्रांना माहित आहे या लढ्यात कुणी कुणी साथ दिली आणि कोणाला दिबांचे त्याग विस्मरणात गेले.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी खर्ची घातले. सिडको प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. प्रकल्पग्रस्तांसाठी जासई या ठिकाणी केलेल्या आंदोलनामध्ये काहींना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी दिलेल्या रक्तरंजित लढ्यामुळे साडेबारा टक्के योजना लागू झाली. त्यामुळे स्थानिकांची आर्थिक दृष्ट्या भरभराट झाली. लोकनेते दि. बा पाटील यांचा त्यागामुळे या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिकांनी दिलेल्या जमिनींवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. लोकनेते दि. बा. पाटील हे एक मोठा उंचीचे नेते होते. त्यांनी अनेक विषयांवर आणि मुद्द्यांवर लढा आणि संघर्ष केला. खासदार, आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्या कार्याची ओळख आगामी पिढ्यांना व्हावी आणि त्यामधून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भूमिपुत्र व लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीने केली. एवढेच नाही तर लढा उभारला. या लढ्यात संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते रामशेठ रामशेठ ठाकूर, माजी मंत्री आमदार गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, कॉम्रेड भूषण पाटील, ओबीसी नेते राजाराम पाटील, काँग्रेसचे संतोष केणे, गुलाबराव वझे, नंदराज मुंगाजी, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, यांच्यासह समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लाखो भूमिपुत्र कायम राहिले आणि या लढ्याला यश आले.

त्या बैठकीत साधा शब्द का नाही दिला – भूमिपुत्रांचा सवाल
आज मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाला दिबांचे नाव देण्याला माझा विरोध नव्हता असे सांगितले असले तरी मागील वर्षी समितीच्या समवेत झालेल्या दोन्हीही बैठकीत दिबांच्या नावाला विरोध का केला असा सवाल उपस्थित होत ठाकरे यांची दुटप्पी भूमिका अधोरेखित झाली. त्या बैठकीत दिबांच्या नावाचा शब्द का नाही दिला असा सवाल उपस्थित होताना सत्तेच्या गणितात आता डाव एकनाथ शिंदे यांच्यावर फिरवून पलटवार करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. दिबांच्या नावाबद्दल कधीही होकाराचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चारला नाही मग आज राजकारणाच्या फेऱ्यातून उद्धव ठाकरे यांना अखेर माघार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून आला. नामकरणासंदर्भात ठाकरे यांना आलेले अपयश आता एकनाथ शिंदे यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

विधीमंडळात दिबांच्या नावाचा गजर
आयुष्याच्या शेवटापर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमुर्ती लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबासाहेबांचे नाव पाहिजे अशी जोरदार मागणी आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठवडा प्रस्तावावर बोलताना सभागृहात केली होती. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. नाव फक्त दिबासाहेबांचेच का हवे यासंदर्भात भूमिपुत्रांची विस्तृत भूमिका मांडत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळात दिबांच्या नावाचा गजर केला होता.

दिबांच्या नावाचा सोयीने विसर पडणाऱ्यांची श्रेयासाठी धडपड
दिबासाहेंबाचा नाव विमानतळाला देण्यासाठी जासई येथे झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या बैठकीला पनवेल उरण नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. जसजश्या बैठका होत गेल्या तसतसे शिवसेनेचे बबन पाटील, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे बैठकीला दिसेनासे झाले, मुळातच महाविकास आघाडी म्हणून त्यांना पक्षश्रेष्ठींकडून आदेश आले आणि शिवसेनेचे बबन पाटील, शिरीष घरत, शेकापचे बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे यांना दिबांच्या नावाचा सोयीने विसर पडला. समितीच्या माध्यमातून भूतो न भविष्यतो आंदोलने झाली, दिबासाहेबांच्या नावासाठी मात्र या महविकास आघाडीतील हि स्थानिक नेते मंडळी फिरकली सुद्धा नाहीत. आणि आता श्रेयासाठी हास्यास्पद धडपड करीत आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133