पनवेल दि.20: पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिबंधित प्लास्टीकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.तसेच सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4(2) अन्वयानुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचे उत्पादन,आयात, साठवण,वितरण विक्री आणि वापरांवर बंदी करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत शासनाच्या निर्देशाप्रमाणे आयुक्तांच्या आदेशान्वये प्लास्टिक बंदीची कारवाई प्रभावीपणे सुरू आहे. प्रभाग निहाय प्लास्टिक बंदी अमंबजावणीसाठी पथके गठीत करण्यातआली आहेत. सदर पथकाद्वारे प्रभागातील विविध दुकाने, मार्केट, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले, हॉटेल व रेस्टॉरंट येथे भेटी देवून प्लास्टिक जप्तीची कारवाई करून दंड करण्यात येत आहे. ही पथके त्या त्या ठिकाणी असणाऱ्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. या कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर १० हजार रुपये ,तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर २५ हजार रूपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.
आजपर्यंत रूपये 1 लाख 5पाच हजार इतका दंड आकारण्यात आला असुन आत्तापर्यंत 450 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सदर कार्यवाहीचा आढावा उपायुक्त (आरोग्य) सचिन पवार व सहायक आयुक्त वैभव विधाते यांचेकडून घेण्यात येत आहे.
एकल प्लास्टिकचा वापर मार्च 2018 पासूनच प्रतिबंधित आहेत.
यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) – हॅडल असलेल्या व नसलेल्या कंपोस्टेबल व प्लास्टिक ( कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन पॉलीप्रोपीलीन बॅग्स (Non-woven Polypropylene Bags ) ६० ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या यावरती बंदी असणार आहे.
अ) प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांडया, प्लास्टिकचे झेंडे, कॅडी, कांडया, आईस्क्रीम कांडया.
ब) सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल ) यावरती बंदी करण्यातआली आहे.
क) कंपोस्टेबल पदार्थापासून बनविण्यात आलेले एकल वापर वस्तु उदा स्ट्रॉ, ताट, कम्स, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर इ. तथापि कंपोस्टेबल पदार्थापासून प्लास्टीक पासून बनविलेल्या अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील.