पनवेल दि.२१: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ होणार आहे.
खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ०९ वाजता होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्या, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रमुख मान्यवर म्हणून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, सुप्रसिद्ध बॉलिवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारी, सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची हि स्पर्धा १३ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, पत्रकार गट ०२ किलोमीटर अशा १३ गटात हि स्पर्धा होणार असून विजेत्यांना २ लाख ९६ हजार रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर हि स्पर्धा खारघर शहरात आयोजित करण्यात आली. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली आणि त्या अनुषंगाने या वर्षीच्या स्पर्धेत १७ हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग नोंदला गेला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!