उलवे, ता. २८ : आजघडीला समाजात बहुसंख्य ठिकाणी भाऊ-बहिणींच्या नात्यातील गोडवा कमी होत चालला आहे. नात्यातील वीण उसवत चालली आहे. मात्र या साऱ्या प्रकाराला आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी छेद दिला आहे. त्यांनी आपल्या भावा-बहिणींना अतिशय आदराची आणि सन्मानाची वागणूक दिली आहे. वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा देऊन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांनी लेकी-सुनांना, बहिणींना १७ वर्षापूर्वी अष्टविनायक, वैष्णोदेवी-काश्मीर, विमानाने दुबई, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर आदी ठिकाणी पर्यटन घडविले आहे. त्यांनी भावा-बहिणींच्या आनंदात आपला आनंद शोधला आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने गेली चार दशके ही सेवा अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांना त्यांच्या सर्व बहिणींनी रक्षाबधनानिमित्त रेशमी धाग्यांनी बांधले.
“समाजासाठी आयुष्य वेचणारे महेंद्रशेठ घरत यांच्यासारखा भाऊ आम्हाला लाभला, हे आमचे परमभाग्य आहे. आमच्या या हळव्या मनाच्या, दिलदार वृत्तीच्या आणि अडीअडचणीत चार दशके सदैव पाठीशी असलेल्या भावाला उदंड निरोगी आयुष्य लाभू दे, असे आशीर्वाद आरती ओवाळून बहिणींनी महेंद्रशेठ घरत यांना दिले.” यावेळी त्यांनी सर्व बहिणींना रक्षाबंधनानिमित्त अनोखी भेट दिली. तुम्हा सर्व बहिणींना आणि लेकी-सुनांना १ सप्टेंबर रोजी तीन दिवस अष्टविनायक दर्शन पुन्हा घडविणार आहे. आज आपण आलात, आनंद आहे, दोन गोड घास खाऊन जा, असा आग्रह केला आणि सर्व बहिणींसोबत कौटुंबिक स्नेहभोजन केले.
