पनवेल दि.४: पनवेल शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनचालकांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः डेरवली ते पळस्पे मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची व वाहतूक कोंडीचे शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेत स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित साबळे आणि पोलीस अंमलदार भोळे यांनी मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता फावडे हाती घेत रस्त्यावरील धोकादायक खड्डे तात्पुरते बुजवले. त्यांच्या या तत्परतेमुळे वाहतूक अधिक सुरक्षित झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
वाहतूक नियंत्रणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करण्याची पोलिसांची तयारी पुन्हा एकदा दिसून आली. जनतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत केलेल्या या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मात्र, या घटनेच्या निमित्ताने रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होण्याची गरजही अधोरेखित झाली आहे. संबंधित विभागाकडून तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती झाल्यास नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडतानाच जनहितासाठी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारून खड्डे बुजवण्याचा पुढाकार घेणारे पोलीस हवालदार साबळे व पोलीस अंमलदार भोळे यांचे कार्य हे कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!