उलवे, ता. ४ : दिबांच्या जन्मभूमीत जासई येथे कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ३)आले होते. यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “रायगडमध्ये कॉंग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी कॉंग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही आहे. केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे, पण दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील.”
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “जासई -उरण तालुका ही दि.बा.पाटील साहेबांची जन्मभूमी आहे. दिबांची कामगिरी देशपातळीवर अभिमानास्पद आहे. अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिलेले नाही, येथील भूमिपुत्र हे कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भूमिपुत्रांनी विजयी करून सरकारचा निषेध करावा, तेव्हा सरकार जागे होईल. महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा मला शंभर टक्के विश्वास आहे. जासई, चिरनेर हे आमचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता येईल.”
जासई जिल्हा परिषद मतदार संघात डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून अॅड अविनाश ठाकूर हे कॉंग्रेसचे उमेदवार उभे आहेत. जासई पंचायत समितीसाठी निर्मला घरत, चिर्लेपंचायत समितीसाठी प्रियंका मढवी, पंचायत समिती उमेदवार कविता पाटील, प्रारंभी गावंड हे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत.
जासई, दिघोडे, कोप्रोली येथील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, प्रभारी डॉमनिक डिमेलो, माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, श्रुती म्हात्रे, उपाध्यक्ष रामनाथ पंडित, जयवंत पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, महिला अध्यक्षा रेखा घरत, शेकापचे नरेश घरत, संतोष म्हात्रे, रवी घरत, बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!