४ लेन, २४० मीटर लांब, २१.५ मीटर रुंद
पनवेल : दि.14 : नागरिकांची होणारी गैरसोय व वाहतुक कोंडी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या हद्दीतील भुखंड क्रमांक ५०६, पनवेल बाजूने करंजाडे मलनिस्सारण उदंचन केंद्राजवळ गाढी नदीवर नवीन पूल उभारण्याची योजना आखली आहे. या पुलामुळे पनवेल शहर, करंजाडे व वडघर येथील सिडको वसाहतीतील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
करंजाडे जाणाऱ्या सध्याच्या पूलावरती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून बऱ्याच वेळेला वाहतूक कोंडी होत असते. तसेच येणाऱ्या काही दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल – करंजाडे मार्गावर होणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
48.50 कोटी प्रशासकीय ठराव मंजूर
या प्रकल्पासाठी एकूण अंदाजित खर्च रु. ४८ कोटी ४० लाख २२ हजार २९५.६३ रुपये इतका असून, पुलाच्या आराखड्याचा प्रस्ताव प्रशासकिय महासभेत मंजूर झाला असून येत्या काही दिवसातच या कामास प्रत्यक्षात कामास सुरूवात होणार आहे.
या प्रस्तावानुसार ४ लेनचा, २४० मीटर लांबीचा आणि २१.५ मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार आहे. पुलाच्या पूर्वेकडे पनवेल महानगरपालिकेचा ४० फूट रस्ता असून पश्चिमेकडे सिडकोच्या करंजाडे नोडकडे २० मीटर रुंद रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यांना जोडल्याने परिसरातील वाहतूक सुलभ होईल व भविष्यातील वाढत्या रहदारीला दिशा मिळेल.
या पूल बांधकामासाठी सिडको, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून अनुक्रमे ना-हरकत प्रमाणपत्रे मागवण्यात येणार असून पुलाच्या संकल्पनात्मक आराखड्याची तपासणी आणि मंजुरी आयायटी मुंबई किंवा व्हीजेआयटी मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
![]()
