पनवेल,दि.१५: पनवेल महापालिकेच्या सन २०२५मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत निश्चित करण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांनुसार या आरक्षण प्रक्रिये करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी 14 प्रभागांचा समावेश करून फेर सोडत काढण्याचे व त्या अनुषंगाने सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जागा नेमून देण्याचे आदेश मिळाल्याने पनवेल महापालिकेकडून १७ नोव्हेंबर रोजी ११:००वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार, एकूण १४ प्रभागामधील (प्रभाग क्र. १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, १३, १४, १६, १९, २०) जागांचा समावेश करुन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिलांच्या ६ जागांची सोडत काढण्याची कार्यवाही शासनाने दि. २० मे, २०२५ रोजी प्रसिध्द केलेल्या नियमातील तरतुदीनुसार करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच सर्वसाधारण महिलांच्या जागांचे आरक्षण देखील नियमानुसार नेमून देण्याचे आदेश दिले आहेत.

१७ नोव्हेंबरची आरक्षण सोडत
आरक्षण सोडत १७नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सोडत आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडणार आहे. यावेळी ना. मा.प्र महिलांच्या आरक्षणाची सोडत काढणे व यथास्थिती नियमानुसार सर्वसाधारण महिला जागा नेमून देण्याची कार्यवाही करणे.

प्रारुप आरक्षण ,हरकती व सूचना १९ नोव्हेंबरपासून स्वीकारणार
सुधारित प्रारूप आरक्षणानंतर नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना १९ नोव्हेंबर २०२५ पासून स्वीकारल्या जाणार आहेत. २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.

हरकती दाखल करण्यासाठी मुख्यालयात व्यवस्था
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी इच्छुकांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात (नागरी सुविधा केंद्र) लेखी अर्ज दाखल करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!