पनवेल, दि.21: महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त, रफीसाहेबांच्या तीन दशकांच्या सुरेल कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ आणि पनवेल कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रफी गीत गायन स्पर्धेस महाराष्ट्रभरातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून तब्बल 100 हौशी गायकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ‘शंभरी’ गाठल्यावर मात्र नाईलाजाने आयोजकांना स्पर्धक नोंदणी बंद करावी लागली. या स्पर्धेची पहिली फेरी पनवेलमधील तथास्तू सभागृहात पार पडली.
या फेरीतून 20 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून ही अंतिम फेरी येत्या रविवारी, दि. 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या दरम्यान रोजी पनवेल महानगरपालिकेच्या फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रभरातून सहभागी झालेले 20 स्पर्धक वाद्यवृंदाच्या साथीने रफीसाहेबांनी गायलेली सोलो गाणी सादर करतील. या अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिद्ध गायिका, हिंदी चित्रपट संगीताच्या अभ्यासक आणि लेखिका डॉ. मृदुला दाढे आणि संगीत संयोजक व नोटेशन तज्ज्ञ अरविंद मुखेडकर करणार आहेत. स्पर्धेतील (16 ते 40 आणि 40 व त्यापुढील अशा) दोन्ही गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी रुपये 7,000 व रु. 5,000 ची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर विविध संगीत कार्यक्रमांतून गेली अनेक वर्षे रफीसाहेबांची गाणी गाणार्या प्रभंजन मराठे, नितीन डिस्कळकर आणि दीपक चव्हाण या रफीसाहेबांची गाणी गेली तीन दशके सादर करणार्या तीन व्यावसायिक गायकांना सन्मानित करण्यात येणार असून त्यांचे एकेक गाणे ऐकण्याची संधीही स्पर्धक आणि उपस्थित रसिकांना मिळणार आहे. पनवेल महानगरपालिका आणि रंगनील नाट्यसंस्था हे या उपक्रमाचे ‘व्हेन्यू पार्टनर’ आहे. हा कार्यक्रम द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड आणि पनवेल कल्चरल सेंटर यांच्या सभासदांना विनाशुल्क असून सदस्यांनी प्रवेशिकांसाठी अजय भाटवडेकर (मो. 99305 40750) अथवा सतीश गुणे (मो. 98204 99498) यांच्याशी संपर्क साधावा.