मुंबई दि.९: जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांचे निधन झाले. शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. २५ डिसेंबर १९२७ रोजी उदयपूर, राजस्थान येथे जन्म झालेल्या पंडित राम नारायण यांनी सारंगीला एक संगत वाद्य म्हणून नव्हे तर एक प्रतिष्ठित एकल वाद्य म्हणून जगभर प्रसिद्धीस आणले होते.
पंडित राम नारायण यांची सारंगी यात्रा लहान वयातच सुरु झाली. त्यांच्या समर्पणामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध सारंगी वादक बनले. त्यांच्या सादरीकरणांनी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांनी जागतिक मंचांवर सारंगी आणि भारतीय अभिजात संगीताला लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात २००५ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्म विभूषण यांचाही समावेश आहे.