अलिबाग, दि.30: जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले. या सर्व परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या महिला सरसावल्या आहेत, अशी माहिती महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा पाटील यांनी दिली आहे.
महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचतगटातील महिलांकडून विविध प्रकारची वस्तूरुपी मदत एकत्रित केली असून यात डाळ, तांदूळ, बिस्कीट, चिवडा, कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, पाणी इत्यादी साहित्याचा समावेश आहे.
हे मदतकार्य अजूनही सुरु असून कर्जत, पेण, उरण, रोहा, अलिबाग इत्यादी ठिकाणाहून साहित्य जमा करून पाठविण्यात येत आहे.
