एका दिवसात साडे सहा कोटीच्यावर कर संकलन
पनवेल,दि.१ : पनेवल महानगरपालिकेने सुधारित मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे. आज ३१ जुलै ही १७ टक्के कर सवलत मिळण्याची शेवटची तारीख असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचा कर संकलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. आज सहा वाजेपर्यत सहा कोटींच्यावर कर संकलन झाले असून आजवरचे हे सर्वाधिक कर संकलन आहे. आज नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आसूडगाव या भागामधून सर्वाधिक भरणा होताना दिसून आला. आत्तापर्यंत एकुण ३८.८७ कोटी मालमत्ता कराचे संकलन झाले आहे.
नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद पहाता मालमत्ता धारकांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी आजची शासकिय सुट्टी रद्द करण्यात आली होती. चारही प्रभाग कार्यालय व मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते.
आजवर झालेल्या सुनावण्या दरम्यान नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन होत असल्याचे दिसून आले आहे. गेले काही दिवसापासून दिवस व रात्रपाळी मध्ये नागरिकांच्या नावामध्ये,पत्त्यामध्ये, सोसायटीच्या नावात,सदनिका नंबर यामध्ये त्वरीत दुरूस्ती करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटत असल्याने मालमत्ता कर भरण्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज अखेर पालिकेच्या सर्वच नोडमधून कराचा मोठा भरणा होताना दिसून आले.
दिनांक ३१ जुलैचे दैनिक संकलन
नोड एकुण कर संकलन
1.पनवेल १८ लाख ८६ हजार ७५२
2.नवीन पनवेल,मोठा खांदा,
खांदा कॉलनी,आसुडगाव २ कोटी ६१ लाख ९० हजार ७८६
3. कामोठे १ कोटी १८ लाख ८५ हजार ७१७
4.खारघर १ कोटी ६४ लाख ४९ हजार११६
5.कळंबोली,
रोडपाली ६१ लाख २० हजार ४८२
6. तळोजा,पाचनंद,नावडे १५ लाख ६१ हजार११४ ———————————————————————
एकुण कर संकलन ६ कोटी ४० लाख ९३ हजार ९९४