अलिबाग,दि.5 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि.14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.
लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने हे मनाई आदेश दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले होते.
मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.17 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने हे मनाई आदेश यापुढेही दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, स्पर्धा, धार्मिक बाबी इ. निगडीत व अन्य सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सण, उत्सव, ऊरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यास मनाई राहील.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक कामाकरिता चार चाकी वाहनांमध्ये एक वाहक व त्या व्यतिरिक्त फक्त दोन व्यक्तींना व दुचाकी वाहनावर केवळ वाहकास प्रवास अनुज्ञेय राहील. तथापि त्या व्यक्तीकडे ती अत्यावश्यक कामासाठी प्रवास करीत असल्याबाबत सबळ कारण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात नागरी तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीवर पूर्णत: बंदी असेल. हे निर्बंध जिल्हादंडाधिकारी यांनी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अन्य सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाहीत. नागरिकांनी सायकांळी 7.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत अनावश्यक कामासाठी बाहेर पडण्यास मनाई राहील. या उपरोक्त.
जिल्हाधिकारी/पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेरील वाहतूकीस बंदी राहील.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात परमिट रुम, बिअर बार, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, सोशल क्लब, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृह, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रालये, व्हिडीओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर, ब्यूटी पार्लर, सलून, स्पा, चहा टपरी, पान टपरी, उपहारगृहे, स्ट्रीट फूड विक्री करणाऱ्या गाड्या इ. बंद राहतील.
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त दुकानांमध्ये मद्यविक्री व बिअर शॉपीमध्ये बिअर विक्री सुरु राहील. तथापि विक्री करताना व्यक्तींमध्ये किमान सहा फूटाचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल त्यासाठी दुकानाबाहेर मार्किंग केले जाणे आवश्यक आहे. या दुकानाबाहेर एका वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत,याची दक्षता घेणे बंधनकारक आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात सेतू केंद्रे, आधार केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट दि.17 मे 2020 रोजीपर्यंत बंद राहतील.
जिल्ह्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी बंद राहतील. या प्रार्थनास्थळांमध्ये परंपरेनुसार केली जाणारी नियमित पूजा अर्चा, धार्मिक विधी तीन किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास मान्यता राहील.
65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षा पेक्षा कमी वयाची मुले यांना अत्यावश्यक बाबी शिवाय तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्य विषयक बाबींशिवाय अन्य कारणासाठी घराबाहेर पडण्यास निर्बंध राहतील.
कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधित केलेल्या (Containment Zones) मध्ये बाह्यरुग्ण तपासणी विभाग (OPDs) आणि दवाखाने बंद राहतील. त्या व्यतिरिक्त क्षेत्रात आवश्यक शारिरीक अंतर (Social distance) ठेवून व सुरक्षा विषयक खबरदारी घेऊन बाह्य रुग्ण तपासणी विभाग (OPDs) आणि दवाखाने सुरू राहतील.
नागरी भागात जेथे बाहेरून कामगार आणावे लागणार नाहीत व कामगारांना कामाच्या ठिकाणी निवासी व्यवस्था उपलब्ध आहे, अशी बांधकामे आणि तसेच नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांस मान्यता राहील. या व्यतिरिक्त ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या बांधकामांस मान्यता राहील. कामगारांची वाहतूक करोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधित केलेल्या (Containment Zones) क्षेत्रामधून अनुज्ञेय राहणार नाही.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात नागरी क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी आवश्यक सिमेंट, हार्डवेअर,पंखा इ. विक्री करणारी दुकाने/सेवा आस्थापना, सर्व Standalone (single) Shops, neighborhood (colony) shops and shops in residential complexes यांच्या व्यतिरिक्त असणारी अन्य दुकाने/सेवा आस्थापना, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स्, सुपर मार्केट इ. बंद राहतील. ग्रामीण भागात मॉल्स व्यतिरिक्त अन्य दुकाने सुरु राहतील (वरील मुद्दा क्र.03 मध्ये नमूद केलेल्या दुकानांव्यतिरिक्त) ही दुकाने सुरु असताना संबंधितांद्वारे नियमानुसार आवश्यक असे शारिरीक अंतर (Physical distance) व दुकानाबाहेर मार्किंग केले जाणे आवश्यक आहे.
जीवनावश्यक वस्तू, औषधे व वैद्यकीय उपकरणे, खते व बियाणे इ. निगडीत ई-कॉमर्स सेवा सुरु रहातील.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी कार्यालयांमध्ये 33 टक्के इतक्या मर्यादेत तसेच सरकारी कार्यालयात 100 टक्के अधिकारी वर्ग व 33 टक्के कर्मचारी वृंद यांची आवश्यकतेनुसार उपस्थिती अनुज्ञेय राहील. या ठिकाणी Work From Home ला प्रोत्साहन देवून जास्तीत जास्त घरुन काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटूंब कल्याण, पोलीस, कारागृह, होमगार्ड,नागरी सुरक्षा अग्निशमन आणि अत्यावश्यक सेवा,आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधीत सेवा, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), भारतीय खाद्य निगम (FCI), राष्ट्रीय सैनिक छात्र दल सेवा (NCC), कस्टम, नेहरू युवा केंद्र (NYK) आणि नगरपालिका/नगरपंचायत यांच्या सेवांकरिता सदर बंधने लागू राहणार नाहीत. खाजगी तसेच शासकीय कार्यालयात आरोग्य सेतू ॲप सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी वापरणे बंधनकारक राहील. याबाबतची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाची राहील.
सर्व सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी Mask / Face cover परिधान करणे बंधनकारक असेल, अन्यथा ती व्यक्ती शासनाने निश्चित केलेल्या दंडनीय कारवाईस पात्र राहील.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधित केलेल्या (Containment Zones) क्षेत्रामधून अथवा भविष्यात प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zones) घोषित केल्यास, अशा क्षेत्रातून कुठल्याही परस्थितीत महामार्गा वरील ट्रक दुरुस्ती करणारे गॅरेजेस/टायर दुकाने/ढाबा/हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आलेले नसावेत. तसेच तेथे कमीत कमी कमी कामगारांसह कामकाज करावे. कामगारांनी Mask/Face cover परिधान करणे तसेच शारिरीक अंतर (Physical distance) ठेवणे बंधनकारक असेल. कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना Sanitizer, Handwash, Masks/Face Cover,Hand Gloves पुरविण्याची जबाबदारी मालकांची असेल.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास (Spiting) संबंधित व्यक्ती/इसम शासनाने निश्चित केलेल्या दंडनीय कारवाईस पात्र राहील.
कोणतीही व्यक्ती/इसम सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखूजन्य पदार्थ इ. चे सेवन करणार नाही.
अनावश्यक गर्दी न होऊ देता, आवश्यक शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील.
50 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती न ठेवता, आवश्यक शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून पूर्व नियोजित विवाह समारंभ पार पाडता येतील.
हे आदेश खालील बाबींकरीता लागू होणार नाहीत/खालील बाबी अनुज्ञेय राहतील.
• शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, बँका इ.
• अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, सर्व प्रकारचे वैद्यकीय
महाविद्यालय (ॲलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथी), नर्सिंग कॉलेज, नर्सेस, वार्ड बॉय, सफाई कर्मचारी,
खाजगी व शासकीय सुरक्षा रक्षक इ.
• अत्यावश्यक किराणा सामान, दूध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, मटन/चिकन/मासे विक्री दुकाने, मत्स्य व मत्स्य खाद्य, कृषी पूरक उत्पादने, खते व बियाणे, पंख्यांची दुकाने इ.,औषधालय (Chemist) व त्यांचे घाऊक विक्रते (wholesaler), वितरक (Distributer), एलपीजी सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू विक्री / वितरीत करण्यास, घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी राहील.
• सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंट मध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील.
• शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडील आदेश दि.30/04/ 2020 नुसार मान्यता प्राप्त बाबी / आस्थापना / कार्यालये / कंपन्या इ. तसेच शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडील दि.02/05/2020 मधील परिच्छेद क्र.7 (ii) मध्ये नमूद केल्याप्रमाणे मान्यता असलेल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाने अत्यावश्यक म्हणून मान्यता दिलेल्या कंपन्या व उद्योग कार्यान्वित राहू शकतील व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या / कामगारांच्या वाहतुकीस आवश्यक वाहतूक परवाने सक्षम प्राधिकाऱ्यांकडून घेण्याच्या अधिनतेने मान्यता असेल.
• प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टिव्ही न्यूज चॅनल इ.) कार्यालये व त्यांची वाहने यांची वाहतूक चालू ठेवता येईल.
• पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी व सरकारी संस्था, साफ सफाई करणाऱ्या संस्था, त्यांच्या गाड्या व जन जागृती करणाऱ्या गाड्या दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या संस्था, विद्युत पुरवठा करणाऱ्या संस्था व ऊर्जा विभाग, बँकिंग सेवा, आयटी सेवा व जीवनावश्यक पुरवठ्याशी निगडीत आहेत, अशा सेवा वगळण्यात येत आहे.
• शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणारी तसेच खाजगी प्रकारची मान्सूनपूर्व कामे उदा.इमारतीचे संरक्षण, शटरिंग, वॉटर प्रुफिंग,फ्लड प्रोटेक्शन,प्रॉपिंग,स्ट्रक्चरल रिपेअर्स तसेच धोकादायक इमारती पाडण्याची कामे इ. करण्यास प्रतिबंध असणार नाही.त्यासाठी आवश्यक सिमेंट, लोखंड, RMC Plant,डांबर व खडी निर्मिती करणारे Plant, हार्डवेअर इ. घाऊक तसेच किरकोळ विक्री करण्यास निर्बंध असणार नाहीत.
• अँम्ब्यूलन्स, वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, सर्व प्रकारची अवजड वाहने, शेतीपूरक मालाची वाहतूक करणारे वाहने, टॅक्ट्रर्स, अग्निशामक दलाची वाहने, क्रेन्स‍, जेसीबी इ. ची वाहतूक सुरु राहील.
• जिल्ह्यातील सर्व CNG, डिझेल व पेट्रोलपंप सुरु राहतील.
• जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यक्षेत्रात कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे यापूर्वी घोषित केलेले अथवा नव्याने घोषित केल्या जाणाऱ्या प्रतिबंधित (Containment Zones) क्षेत्रास वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या बाबींवरील सूट अनुज्ञेय राहणार नाही.
हे आदेश पोलीस, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 अन्वये फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी सूचित केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!