एकाच दिवशी मतदानाचा फटका नवी मुंबई ,पनवेलला बसणार
कळंबोली दि.१८ (दीपक घोसाळकर) पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या संख्येने पनवेल सह नवी मुंबईत वास्तव्याला आहेत. लाखो नागरिक, कामगार, माथाडी कामगार व नोकरीच्या निमित्ताने पनवेल व नवी मुंबई राहत आहेत. विधानसभेचे मतदान एकाच दिवशी असल्याने आता या सर्व मतदारांना पश्चिम महाराष्ट्रातल्या गावकी ने साद दिली आहे .यावेळेस मतदानाला गावाला यायचं, गावकी, अन भावकीसाठी तुम्हाला यावच लागेल असे अलिखित फतवेच निघालेले आहेत. याकरता पनवेल व नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी विविध पक्षांच्या नेत्यांनी मेळावे ही घेतले आहेत. त्यांना प्रतिसाद ही भरघोस मिळाला आहे. त्यामुळे पनवेल व नवी मुंबईतील पश्चिम महाराष्ट्रातील वासियांनी म्हटले की आमचे ठरलय गावकीसाठी अन भावकीसाठी मतदानाला गावाला जायचयच. त्यामुळे एकाच दिवशी होणाऱ्या मतदानाचा फटका हा पनवेल सह नवी मुंबईतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांना चांगलाच बसणार आहे.
लोकशाहीच्या उत्सवात मतदार राजा हा खरोखरचा राजा असतो. मतदान घेण्यासाठी मतदाराची जुळवा जुळव करण्यासाठी विविध पक्ष आणि उमेदवार विविध उपायोजना करत असतात. मागच्या वेळेस राज्यात टप्प्याटप्प्याने मतदान असल्यामुळे एका ठिकाणी मतदान केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणीही अनेक मतदारांनी मतदान केलं होतं. मात्र यावेळेस राज्यातील सर्वच मतदान एकाच वेळी असल्याने मतदारांची पळवा पळवी, मतदारांची जमवा जमव करणे हे उमेदवारांच्या नाकी नऊ आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्र मधील जिल्ह्यातील हजारो नागरिक आपल्या नोकरी व्यवसाय, धंद्यानिमित्त वास्तव्य करून आहेत. या सर्व मतदारांना त्यांच्या त्यांच्या गावातील त्यांच्या मूळ गावातील विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांच्या उमेदवारांनी साद दिली आहे, की मतदानाला गावालाच यायचं आहे. सर्वच उमेदवारांनी पनवेल, कामोठे, खारघर, नवी मुंबईतील विविध भागात मेळावे घेऊन त्याची चाचपणी ही केली आहे. कळंबोली मध्ये झालेल्या विविध प्रकारच्या मेळाव्याला हजारोंची उपस्थिती ही दिसून आली आहे. या सर्व मतदारांना पश्चिम महाराष्ट्रात नेण्यासाठी २० तारखेला वाहनांची व्यवस्था त्या त्या उमेदवारांकडून व पक्ष स्तरावर करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मतदार हे पनवेल व नवी मुंबईत मतदान न करता ते आपल्या मूळ गावी मतदानाला जाणार आहेत. हे निश्चित ठरलेल आहे .या मतदारांना त्यांच्या गावकिने अलिखित असा महत्वाचा फतवा जारी करून मतदानाला तुम्ही गावाला यायचेच आणि आपल्या उमेदवाराला विजयी करायचे अशी हाक दिली आहे. त्यामुळे पनवेल, नवी मुंबईतील मतदार पश्चिम महाराष्ट्रात मतदानाला गेल्यानंतर त्याचा निश्चितच फटका हा पनवेल व नवी मुंबईतील उमेदवारांना चांगलाच बसणार आहे .उमेदवारांचे विजयाचे गणित त्यामुळे कोलमडून गेले आहे. उमेदवारांना आत्ताच मतदारांचा धावा करण्यासाठी धावा धाव करावी लागत आहे. परंतु गावाशी एकनिष्ठ राहण्यासाठी हा मतदार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तो आपल्या गावाकडला रस्ता निश्चित धरणार आहे. गेल्या महिन्याभरात कळंबोली, कामोठा, खारघर, खांदा कॉलनी व नवी मुंबईतील विविध ठिकाणी सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील मतदारांचे विविध ठिकाणी मेळावे झाले. या मेळाव्यांना हजारोंची उपस्थिती होती. त्यामुळे येथील उमेदवारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आता मदार आहे की या मतदारांना पनवेल व नवी मुंबईमध्ये मतदानाला थांबवायचे कसे यासाठीच आटापिटा सुरू आहे. लोकशाहीत एका वेळीच एका ठिकाणीच मतदान करण्याचा हक्क मिळतो. परंतु एका विधानसभा क्षेत्रामध्ये एकाच वेळी परंतु अन्य विधानसभा क्षेत्रामध्ये हजारो मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले आहे. गत काळामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार मीष्किलीने प्रचार सभेत बोललेही होते की नवी मुंबईत मतदान करायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गावाला यायचे आणि मतदान करायचे. परंतु आता मतदान हे एकाच टप्प्यात आहे. त्यामुळे कुठेतरी एकाच ठिकाणी मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी मनाशी पक्क ठरवले की मतदानाला गावाला जायचे गावकी अन भावकी जपायचे. त्यांच्या या निर्णयाने पनवेल सह नवी मुंबईतील उमेदवारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!