अलिबाग, दि.२९: कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील समुद्रकिनाऱ्यांवर दि.26 मे 2022 पासून ते दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुरुड येथील जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे.
दरम्यान या बंदी कालावधीतही व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स किंवा बोटिंग सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी येतात.
दरम्यान हा निर्णय मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेमुळे घेतलेला नसून मान्सून काळात दरवर्षीप्रमाणे करावयाची कार्यवाही आहे. पावसाळा तसेच समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे.