पुणे दि.21: संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा पुण्यातील चिंचवड येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाराजांच्या पश्चात त्यांची मुलगी आणि दोन मुले आहेत. आळंदीमध्ये त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आळंदी येथील साधकाश्रमात गुरु-शिष्य परंपरेचा अंगीकार करून साखरे महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे अध्ययन केले. 1960 रोजी साधकाश्रमाची धुरा साखरे महाराजांच्या हाती आली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनातून गावागावात त्यांनी अध्यात्मिक प्रबोधन केले.
श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. साखरे महाराज यांना महाराष्ट्र सरकारतर्फे 2018 साली ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट. या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित केले होते.