🔸मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी रेल्वेगाडीला दाखवला भगवा झेंडा
🔸आमच्या अयोध्या दौऱ्याने घरात बसलेल्यानाही कामाला लावले, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
ठाणे दि.७: जय भवानी जय शिवाजी,
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आणि जय श्रीरामच्या नाऱ्यानी ठाणे स्थानक परिसर दणाणून सोडत आज ठाणे जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या गाडीला भगवा झेंडा दाखवत त्यांना अयोध्येकडे रवाना केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे अधिकृत पक्षचिन्ह दिल्यानंतर त्यांनी आपले मंत्री, आमदार आणि सहकाऱ्यांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक देखील अयोध्येला रवाना झाले आहेत. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सोबतच ते अयोध्येला पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या सोबतच रामलल्लाचे दर्शन घेतील.
या विशेष गाडीला भगवा झेंडा दाखवून अयोध्येकडे रवाना केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, प्रभू श्रीरामाच्या आशिर्वादाने आम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले असून त्याबद्दल प्रभू श्रीरामाचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सारे अयोध्येला जात आहोत. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारले जावे ही स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, हे स्वप्न आज पूर्ण होत असल्याने याची देही याची डोळा हे मंदिराचे निर्माण कार्य पहाण्यासाठी तिथे जात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच सर्व शिवसैनिक मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री,आमदार, खासदार आणि शिवसैनिकांच्या सोबत रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येत भव्य राम मंदिर मंदिर उभारण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सोडला असून ही अभिमानास्पद बाब आहे त्याबद्दल त्यांना तमाम हिंदू बांधवांच्या वतीने धन्यवाद देत असल्याचे सांगितले. तसेच या अयोध्या भेटीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या या अयोध्या दौऱ्यामुळे अनेकजण कामाला लागले असून घरात बसून कारभार करणाऱ्यांनाही घरातून बाहेर पडावे लागले आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. गतवेळी अनेकांना अयोध्येला जायची इच्छा असूनही ती पूर्ण होऊ शकली नव्हती त्यामुळे यावेळी या दौर्याबाबत सर्व शिवसैनिकामध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ठाणे जिल्हा महिला संघटीका सौ. मीनाक्षी शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.