मोखाडा दि.८ (हरेश साठे) राजकारण बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या पाठीशी कायम आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोखाडा येथे काढले.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

एक शाळा असलेली रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील क्रमांक एकची संस्था झाली आहे. ती अनेकांच्या योगदानामुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णांनी शिक्षण कार्यातून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण काम केले आणि हाच आदर्श कर्मवीर अण्णांनी घेतला आणि त्यामुळे या संस्थेच्या शाखा विस्तारल्या. त्यातील मोखाडा ही एक शाखा असून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजकारण बाजूला ठेवून शिक्षण कामात लक्ष आणि त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेच्या मदतीला धावून येतात त्या वेळी त्या शाखेचा विकासात्मक बदल घडत असते. कमवा आणि शिका या उद्देशातून शिकलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले व्यक्तिगत जीवन सुधारत असताना रयत शिक्षण संस्थेला मदत करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे असे नमूद करतानाच एकही वर्ष मदतीशिवाय जात नसल्याचे खासदार शरद पवार यांनी अधोरेखित केले. येथील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकणार आहेत, कारण येथील आदिवासींच्या जीवनात विकासाचे परिवर्तन घडविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील बुसारा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर, चिरंजीव परेश ठाकूर, त्यांच्या पत्नी अर्चना ठाकूर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी.देशमुख, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, विनायक पाटील, मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले, संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळुंखे, शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभाग अध्यक्ष संजीव पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर, आर. डी. निकम, बाबासाहेब भोर, पी. जी. पवार, के. जी. कानडे, किशोर काकडे, एस.के. पाटील, जे. जी. जाधव, सुभाष शिंदे, शहाजी डोंगरे, चंद्रकांत दळवी, रमेश सानप आदी प्राचार्य मंडळींसह महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून मान्यवर मंडळी ग्रामस्थ, ठाकूर कुटुंबीय, लोकप्रिनिधी उपस्थित होते. या वेळी रयत शिक्षण संस्था आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने ठाकूर कुटुंबीयांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

आम्हाला प्रेम दिले, कॉलेजला नाव दिले त्याबद्दल आभार -लोकनेते रामशेठ ठाकूर
शरद पवारसाहेबांनी कधीही पक्षभेद केला नाही. त्यांचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिले आहे. त्याचरोबरीने दिलीप वळसे-पाटील, डॉ. अनिल पाटील यांनीही नेहमीच सहकार्य केले. भगीरथ शिंदे मोठ्या भावाप्रमाणे पाठीशी राहिले. आम्ही सर्व मिळून संस्थेसाठी एकदिलाने काम करीत आहोत. कर्तृत्व देण्यासाठी काम करणे गरजेचे असते कर्मवीर अण्णांनी संस्थेने मला वळण दिले त्याप्रमाणे आपण काम करीत आहोत. आधुनिक पद्धतीचे कोर्सेस या मोखाडा महाविद्यायात उपलब्ध करून देत हे महाविद्यालय नामवंत होईल त्यासाठी प्रयत्न राहणार असून आम्हाला प्रेम दिले, कॉलेजला नाव दिले त्याबद्दल आभार मानतो, असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133