मुंबई दि.१३: यावर्षी शनिवार १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच त्यांनी मकर संक्रांती विषयक वैज्ञानिक माहितीही दिली.
दा. कृ. सोमण म्हणाले की,निरयन मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही.
सन २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांती १५ जानेवारीला तर सन २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार आहे.
सूर्याने २१ डिसेंबर २०२२ रोजी उत्तररात्री ३-१८ वाजता सायन मकर राशीत प्रवेश केला त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ झाला दिनमान वाढू लागले. त्या दिवशी रात्र मोठी (१३ तास ३ मिनिटे) व दिनमान लहान (१० तास ५७ मिनिटे) होते. त्यादिवसापासून दिनमान वाढू लागले. आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांती साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुस-या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते.
कोणतीही वाईट घटना घडली की, ‘संक्रांती आली’ असे म्हटले जाते हे योग्य नाही असे सांगून दा. कृ. सोमण म्हणाले की, धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे वाईट कसे असू शकेल ? या दिवसापासून
दिनमान वाढत जाणे हे वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट कसे असू शकेल ? मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही. वाईट नाही. मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. मकर संक्रांती कोणालाही वाईट नसते हे सोमण यांनी स्पष्टपणे सांगितले.
मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात (सुघटात) ऊस, बोरे, शेंगा , गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ दान देण्याची पद्धत आहे. तसेच मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात. गरोदर महिला, विवाहाच्या प्रथम वर्षी सूना, नूतन वर्षात बालके यांनाही काळी वस्त्रे व हलव्याचे दागिने घालून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तीळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देवून मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सूर्याचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी पतंग उडविण्याची प्रथा आहे. परंतू पतंग उडविण्यासाठी धारदार नॅायलॅानच्या मांजाचा वापर करू नका. कारण आकाश हे पक्षांचेही आहे. धारदार मांज्यामुळे अनेक पक्षी घायाळ होतात. असे होता कामा नये.
मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान, अन्नदान, तिळगूळ दान देण्याची प्रथा आहे. परंतू आधुनिक कालात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान, रक्तदान, सामाजिक- शैक्षणिक संस्थाना अर्थदान करणे हेही तितकेच पुण्यदायक आहे असे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.